Monday 10 August 2015

कळतं पण वळत नाही...!!


"कळतं पण वळत नाही” हि जुनी म्हण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खूप सत्याची भूमिका बजावते. जसे आपण एखाद्या धार्मिक स्थळात किंवा देवात सत्व आहे असं म्हणतो व मानतो. तसच काहीसं ह्या जुन्या म्हणीमध्ये सत्व आहे. 

प्रत्येक व्यक्तीला त्याचे दुर्गुण माहित असतात व त्या दुर्गुणांचा होणारा परिणाम सुद्धा माहित असतो. मग ते दुर्गुण लहान असो वा मोठे व त्यांचा परीणाम शारीरिक असो वा मानसीक त्यातून एकंदरीत हानीच असते हे सुद्धा आपल्याला माहित असतं. आपल्याला कळतं कि, कुठली गोष्ट चांगली आहे व कुठली वाईट शिवाय कुठल्या गोष्टीला लगेच प्रारंभ करायला हवा, प्रथम प्राधान्य द्यायला हवे व कुठल्या गोष्टीला विलंब करायला हवा. 

मग का म्हणून आपण योग्य दिशेला पाउल टाकण्यासाठी विलंब करत असतो..?. चांगल्या व ज्या गोष्टीतून आपला सर्वांगीण फायदा होणार आहे अश्या गोष्टीची सुरुवात करायला का विलंब करत असतो..?. आपसूकच आपण कुठेतरी मागे खेचले जात असतो...असं का..?. आपल्याला संपूर्ण ज्ञान असतांना सुद्धा आपण अज्ञानीपणा करतो..असं का..?. आपण दुसऱ्यासाठी ज्ञानाचे धडे गिरवतो पण बऱ्याचवेळा आपण स्वतः मात्र त्या ज्ञानापासून दूर राहतो किंवा ते ज्ञान आत्मसात नाही करू शकत...असं का..? 

तर स्वतःचे आत्मपरीक्षण करून थोडे निष्कर्ष काढले ते म्हणजे, कदाचित आपण आपल्या सवयींचे गुलाम झालेलो असतो. आपल्या सवयी आपल्याला जसे झुकवतील तसे आपण झुकत असतो. कुठेतरी आपला संयम ढासळतो व आपले प्रयत्न कमी पडत असतात म्हणून असं होत असावं. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे आपला आळस व दूरदृष्टीची कमतरता ह्या दोन घातक गोष्टी आपल्याला योग्य गोष्टींना आजच्या दिवशी प्रारंभ करण्यास विलंब करत असाव्यात. म्हणून आपण चांगल्या गोष्टींना प्रारंभ हा आज न करता उद्यावर ढकलत असतो.  

ह्या विचारतून एक बोध नक्की मिळाला तो म्हणजे “अनमोल वेळ, सुवर्ण संधी व योग्य वय ह्या तिन्ही गोष्टी आपल्या हातातून नकळत निसटत आहेत.”    

तर योग्य गोष्टींचा प्रारंभ हा आजच व या क्षणापासूनच करणार. 

(स्वनुभव मांडण्यात मजा थोडी वेगळीच असते कारण स्वनुभव मांडतांना आपण स्वतःला वाचत असतो.)

.. मनोज गुजर  

Saturday 27 June 2015

विचार ५२.

लोकं आपल्याला काही वर्षापासून किंवा काही दिवसांपासून ओळखत असतात. पण आपण स्वतःला आपल्या जन्मापासून ओळखत असतो. त्यामुळे लोकांनी आपल्याबद्दल कुठलाही गैरसमज केला तरी काळजी नसावी. आपण कसे आहोत हे एकाच व्यक्तीला उत्तमरीत्या माहित असतं आणि ती व्यक्ती म्हणजे आपण "स्वतः". मग का म्हणून लोकांची निवड हि, आपण आपली निवड समजावी..?.

.. मनोज गुजर

विचार ५१.

लिखाण हे एक सुंदर माध्यम आहे आपल्या मनातल्या चित्रात रंग भरण्याचे. 

.. मनोज गुजर

Friday 17 April 2015

सर्व काही तूच.

तूच देव जाणला
तूच देव मानला
तूच ठरवितो कोण
आस्तिक
तूच ठरवितो कोण
नास्तिक
तूच देव वर्णिला
तूच पाहिले त्याचे
विराट रूप
तरी, तूच म्हणवितो देव
निर्मितो आम्हास
तूच देव विभागला,
तूच देव जातीत वाटला,
तूच बांधली देऊळ,
तूच बांधली मंदिरं
तूच वेदाआधी होता
तूच परमेश्वराआधी होता
तूच जाणले वेदाचे
चमत्कार
तूच साजरे केले
ईश्वराचे जन्मोत्सव  
तूच सूर्याला सूर्य म्हटले
व सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटले
व चंद्र, चंद्र झाला   
तूच अवघ्या विश्वाचे
नामकरण केलेस
तूच आहेस सर्व काही
हे सामर्थ्यवान माणसा
तुझ्यामुळेच अर्थ आहे
विश्वाला हि
जाण असू दे रे माणसा.
 
.. मनोज गुजर

Friday 3 April 2015

बदल.

धावतं युग, धावत्या युगात झपाट्याने व दररोज होणारे बदल, प्रत्येक गोष्टीत अत्याधुनिकता हे सर्व काही आज आम्ही स्वीकारतो आहे व हे बदल स्वीकार करणाऱ्यालाच ह्या युगात वावरता येईल हेही तितकेच सत्य आहे. इथे सर्व काही बदलत आहे पण मनुष्य मात्र तसाच आहे हि वस्तुस्थिती आहे. ह्या युगात प्रत्येक गोष्टीत बदल करणे खूप सोपं आहे. पण जगातील सर्वात मोठा व सर्वात कठीण बदल म्हणजे “माणसात होणारा बदल”. आज प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसात बदल घडवण्यात व्यस्त आहे व दुसरा मनुष्य आपल्यात. पण ह्या लपंडावात ना आपल्या काही हाती लागते, ना दुसऱ्या मनुष्याच्या हाती काही येते. यातून फक्त एकच निष्कर्ष हाती येतो तो म्हणजे “मौल्यवान वेळ व शक्ती खर्च होणे” (वेस्ट ऑफ टाईम अँड वेस्ट ऑफ एनर्जी). 

ते म्हणतात ना “सुंदर पोशाख करून विद्वान दिसणं खूप सोपं आहे पण सुदर पोशाख करून विद्वान बनणं खूप कठीण आहे” आमची सुद्धा अशीच गत झाली आहे. आम्ही जेव्हा समूहामध्ये असतो तेव्हा खूप विद्वान असल्याचे भासवतो व जेव्हा घरात असतो तेव्हा आपला मुळं स्वभाव दाखवतो.

तर आजपासून पहिले स्वतःत बदल घडवू, पहिले स्वतः बदलू व नंतर दुसऱ्यांना बदलवू. आपणच आपल्या जीवनात आपले आदर्श व प्रेरणास्थान होऊ. 

(टीप – हा बदल मी पहिले माझ्यात करायला सुरुवात केली आहे.)  

.. मनोज गुजर

Tuesday 24 February 2015

विचार ५०.

आयुष्यात "बोलणारी" व्यक्ती बनू नका तर "करणारी" व्यक्ती बना. 

.. मनोज गुजर


Sunday 7 September 2014

विचार ४९.

सर्व माणसांना दोन हात, दोन पाय व एक डोकं असे सारखेच अवयव असतात. पण माणसाला जातीचा अलंकार चढला कि, तो माणुसकी व माणसाला विसरतो आणि स्वतःला वेगळं समजू लागतो हि वस्तुस्थिती आहे.

.. मनोज गुजर