Thursday, 18 October 2012

राजं तुम्हासनी आई भवानीची आण हाय.


राजं या कि पुन्हा जन्माला, राजं आई भवानीची आण हाय तुम्हास्नी, पुन्ह्यांदा जन्माला या राजं 

राजं, राजं म्या...म्या हाय कि तुमच्या संग, कायभी कराया तयार हाय, फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं.
राजं म्या फितूर नाय व्हनार राजं. राजं तुमची आण घेतूया मंग इथल्या दगडाशी भी खोट नाय बोलायचो म्या. राजं म्या लढीन त्या १२ मुल्काचा १८ पगड जातीचा मावळा होवुन, फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं.

राजं जाऊ की, मग संग किल्ले जंजिरास्नि जिंकाया. राजं म्या....म्या खेळीन की रक्ताची रंगपंचमी, तुम्हास्नी कायभी नाय करू द्यायचा राजं, राजं हाय माझ्यात ताकद पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं.  

राजं म्या होईन त्यो बाजी, जीवाची बाजी लावून त्यानं तुम्हास्नी सुखरूप ठेवलं. राजं म्या लावीन कि माझ्या जीवाची बाजी, फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 


राजं म्या होईन त्यो दर्या सारंग, अशी जरब बसविन राजं समुंदरावर कि, समुंदराचं पाणी भी चळा चळा कापाया लागल, पण राजं फकस्त तुम्ही जन्माला या राजं. 


राजं...म्या, म्या होईन त्यो नूरखान बेग ज्यानं खरा धर्म ओळखीला. राजं...राजं म्या एकटा भारी पडल राजं सर्वास्नी, फकस्त राजं तुम्ही जन्माला या राजं.  

राजं म्या होईन त्यो कान्होजी जेधे, नेहमी तुमचीच बाजू मांडाया, राजं मग अशी भी जरब बसविन शत्रूवर कि, पुन्हा महाराष्ट्रात फिरकायचा नाही. पण राजं फकस्त तुम्ही जन्माला या राजं.  

राजं म्या होईन त्यो जिवाजी महाल, त्यो रांगड्या धडाचा, मदमस्त चालीचा अन अफाट ताकदीचा असं भी गनिमाला ठार करीन राजं कि, त्यो पुन्हा वाटेला यायचाच नाय. पण राजं फकस्त तुम्ही जन्माला या राजं.  

राजं म्या होईन त्यो बाजी प्रभू, जीवाची बाजी लावाया. असा भी रडविन त्या मृत्यूला कि, त्यो लाख पस्तावीन राजं. पण राजं फकस्त तुम्ही जन्माला या राजं. 

राजं म्या होईन त्यो बहिर्जी नाईक, जणू तुमचा तिसरा डोळाच, राजं असं भी शत्रूला फाडीन कि, त्याला ठिगळ लावाया कुठभी जागा उरणार नाय. पण राजं फकस्त तुम्ही जन्माला या राजं. 

राजं म्या होईन कि, त्यो मुरारबाजी, नंग्या तलवारी नाचविणारा, मृत्यूला पळविणारा अन वेळ प्रसंगी जीव भी देणारा. व्हय राजं म्या होईन त्यो. पण राजं फकस्त तुम्ही जन्माला या राजं. 

राजं म्या होईन त्यो हिरोजी त्योच मदारी मेहतर, तुम्हास्नी सुखरूप बाहेर काढाया खुद्द यमाच्या दरबारात उभा ठाकलेला. होय म्या उभा ठाकीन राजं यमाचा दरबारात, तुमच्यासाठी कायभी करीन. पण राजं फकस्त तुम्ही जन्माला या राजं. 

राजं त्यो नाय का तान्हा होय त्योच तान्हाजी, व्हय व्हय...म्या होईन कि त्यो तान्हाजी. तुमचा सवंगडी, जो पोटच्या पोराचं लगीन न लावता कोंढाण्याचं लगीन लावाया गेला तर त्यो पुन्हा घावलाच नाय. होय राजं म्या करीन तशी जिगरबाज झुंज. पण फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

राजं म्या होईंन कि, त्यो शेलाराम ८० वर्षाच 
तरुणास्नी भी लाजवणारं ते रांगड शरीर. व्हय राजं म्या होईन कि, त्यो. पण फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

राजं म्या होईन कि त्यो सूर्याजी, आपल्या तान्हा चा भाऊ ज्यानं जिगरीनं सिंदगड जिंकला. व्हय राजं मला भी व्हायचं राजं तसं, जिगरीनं जिंकायचय राजं तसं, तुमच्यासाठी काहीतरी करायचंय राजं, पण फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

राजं म्या होईन त्यो नेताजी, नेताजी पालकर, म्या होईन त्यो कडतोजी. जो आपल्या प्रतापान प्रतापराव झाला अन तुमच्यावर त्यानं जीवापाड प्रेम केलं. व्हय राजं म्या होईन त्यो प्रतापराव. पण फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 


राजं म्या होईन त्यो सिद्धी हिलाल, जो वाऱ्यासारखा आला अन वेडात विर झाला. राज म्या होईन कि तसा, पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

राजं...राजं....म्या होईन....व्हय, म्या होईन त्यो हम्बीराव, ज्यानं अफजल्ल्याच्या वेळला ६०० गनिमांना नर्क दाखिवला. व्हय राजं म्या होईन त्यो. पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

राजं म्या होईन त्यो हिरोजी...हिरोजी इंदूलकर, ज्यानं आपली जमीन विकून राजधानी बांधून काढलीया. व्हय राजं म्या होईन त्यो, पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

राजं, राजं म्या....म्या होईन कि, त्यो...त्यो शिवा काशीद. राजं त्यो जन्मला जरी शिवा काशीद असला तरी मरतांना मात्र शिवाजी महाराज म्हणून गेला हे भाग्य का कोनलाभी लाभतं व्हय. राजं म्या मरीन कि शिवाजी महाराज म्हणून. पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

राजं पुन्हा त्या अफजल्ल्याला फाडू राजं अन व्हय राजं त्या कृष्णाजीला असा भी उडवितो राजं, कि पुन्हा ३५० वर्ष जन्म घ्यायचा नाही त्यो. राजं तुम्हास्नी काय भी नाय करू द्यायचा म्या. पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

अन व्हय राजं त्यो औरंग्या राहिलाच कि, या राजं, इतका फाडू राजं औरंग्याला इतका फाडू कि, त्याला ठिगळ लावाया जागाच उरायची नाय इतका फाडू. राजं आपल्या शंभू राजांची पुरी तहान भागवू इतका फाडू राजं. पण फकस्त राजं तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

मग राजं येताय नव्ह म्या होईन ना राजं त्यो १२ मुल्काचा १८ पगड जातीचा मावळा. राजं तुम्हास्नी आई भवानीची आण हाय. तुम्हास्नी यावच लागल. म्या तुमची वाट पहातुया राजं. राजं या मंग लवकर म्या हायच तुमच्या संग...!! 


.. मनोज गुजर