महाराष्ट्रात जन्मलेल्या महापुरुषांचा, युग पुरुषांचा इतिहास शिवाय त्यांचे कर्म व शिकवण विसरलेल्या सुशिक्षित,
तरुण पिढीला ह्या महापुरुषांच्या कर्माची जाणीव करून देण्याचा माझा हा
छोटासा प्रयत्न आहे.
प्रथमतः एक सांगतो कि, जात आणि धर्म मानव निर्मित आहे ईश्वर निर्मित नाही. म्हणून माणसाचा
जातीनुसार आदर करू नका तर त्याच्या कर्माचा, कर्तुत्वाचा व
विचारांचा आदर करा. ह्या महापुरुषांनी, युग पुरुषांनी स्वतःचे
आयुष्य हे समाज सुधारणेसाठी व जन हितासाठी खर्ची केले. त्यांच्या ध्यानी मनी फक्त जनकल्याण
व जनहितच होते. जणू ते जन कल्याणाला जीवन आणि स्वार्थाला मरण मानणारे महामानव
होते. आयुष्य कर्माच्या अलंकारांनी शोभून दिसते हीच त्यांची शिकवण होती.
मेलेल्यांसारखं जीवन जगण्यापेक्षा एक दिवस तरी सूर्या सारखे तळपून अस्तास जा असले
संस्कार दुध पाजणारे हे महापुरुष होते.
पण आज आमचं दुर्देव कि, आम्ही ह्या महापुरुषांना
वेगवेगळ्या जातीत गुरफटून टाकले आणि त्यांचे कर्म विशिष्ट जातीपुरताच मर्यादित
ठेवले. जसे महात्मा फुले माळी समाजाचे, अण्णाभाऊ साठे मातंग
समाजाचे, गाडगेबाबा परीट (धोबी) समाजाचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजाचे, छत्रपती
शिवराय मराठ्यांचे असले वर्गीकरण करून आम्ही ह्या महापुरुषांच्या कर्माला,
कर्तुत्वाला व विचारांना कायमचा थांबा आणला.
आमचं दुर्दैव इतकं कि, आज आमच्या पिढीला, सुशिक्षित वर्गाला ह्या महापुरुषांची चेहऱ्याने सुद्धा ओळख पटत नाही इतकी
खालावली आहे आमची संस्कृती. आजच्या पिढीला ह्या महापुरुषांच्या शिकवणी पासून,
त्यांच्या इतिहासापासून वंचित ठेवायला आमचे आई वडीलच जबाबदार आहेत. कारण
आमचे आई वडील आम्हाला लहानपणापासूनच ह्या महापुरुषांची ओळख जातीच्या
वर्गीकरणानुसार करून देत आहेत.
डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, आपल्या कर्माने कर्मवीर ठरले आणि आजही जगासमोर कर्मवीर ह्या नावानेच
त्यांची ओळख पटते. महारा-मांगाच्या पोरांना शिकवणारा हा देवमाणूस होता. जणू
माणसातला देव ह्या महापुरुषाने जाणला होता आणि आज आम्हाला ह्या महापुरुषाची
चेहऱ्याने सुद्धा ओळख पटायची नाही इतका कोप झालाय आमच्या संस्कृतीचा.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, फक्त नावानेच शाहीर नव्हे तर कर्माने शाहीर असलेला हा महापुरुष होता.
ज्याने अंधश्रद्धा दूर करून बहुजानामध्ये ज्ञानाचे बीज पेरले. पृथ्वी शेषनागाच्या
मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे असला संदेश पोहचवणारा हा
महापुरुष होता आणि ह्या महापुरुषाला आज आम्ही मातंग समाजापुरता मर्यादित ठेवले.
डॉ. पंजाबराव देशमुख, ह्या महापुरुषाने दलित वर्गाला उच्च शिक्षणाची पायरी दिली. गोरगरीब
विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मुलमंत्र दिला.
संत गाडगे महाराज, ह्या महापुरुषाने
नेहमी माणसातच देव पहिला आणि जाणला. कर्माला देव मानणारा आणि कार्मालाच पूजणारा हा
महापुरुष होता. उत्तम कर्म हाच माझा धर्म मानणारा हा महान संत, महान समाजसेवक होता.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ह्या महापुरुषाने भारताची राज्यघटना लिहिली आणि सामन्य माणसापरियंत कायदा
पोहचवला. संपूर्ण आयुष्य ह्या महापुरुषाने समाज सुधारणेकरिता खर्ची घातले आणि आज
त्याच महापुरुषाच्या स्मारकाकडे आम्ही तिरक्या तिरस्कारी नजरेने पाहतोय, हि किती मोठी शोकांतिका आहे.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज, ह्या राजाला आरक्षणाचे जनक म्हटले जाते. आज आम्हाला जे आरक्षण मिळते ते
ह्याच राजामुळे हे आम्हाला पहिले ठाऊक असले पाहिजे. ह्या राजाने सर्व धर्मासाठी
लढा दिला होता. हा राजा सर्व धर्माला एक समान प्राधान्य द्यायचा.
महान संत तुकडोजी महाराज, ह्या संताने दान घेण्यासाठी हात पसरू नका तर दान देण्यासाठी हात वर करा हा
संदेश जन मानसात पोहचवला. सर्व सामान्य
लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारे, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारे, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारे, सर्व धर्म सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारे, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.
विश्व वंद्य महात्मा जोतीबा फुले आणि विद्या
ज्योती सावित्री आई फुले हि जन माणसात विद्येचे बीज पेरणारी सुवर्ण जोडी होती.
महात्मा जोतीबा फुले घर घरात जाऊन शिक्षणाचे महत्व पटवून देत असायचे. गोर गरीब, दिन दुबळ्या परियंत शिक्षणाचा प्रसार ह्या महापुरुषाने केला होता. ह्या
महापुरुषाने १ जानेवारी १८४८ साली पुण्यामध्ये मुलींसाठी भारतातली पहिली शाळा सुरु
केली म्हणून आज आमच्या माता भघिनी उच्च शिक्षित आहेत हे आमच्या माता भगिनींनी
लक्षात ठेवायला पाहिजे.
विद्या ज्योती मानली जाणारी सावित्री आई फुले,
ह्या मातेने अपमानाचे वार झेलून मुलींमध्ये शिक्षणाचे
बीज पेरले आणि आमच्या माता भगिनींना शिकवले हे आमच्या सुशिक्षित, तरुण वर्गाने लक्षात ठेवायला पाहिजे. हि सुवर्ण जोडी सर्व विद्यापीठांच्या
कुलगुरूंची कुलपती मानली जायची. इतकी थोर कामगिरी होती ह्या सुवर्ण जोडीची.
शेवटी एकच सांगतो माणूस हा कर्तुत्वाने मोठा ठरतो
वयाने नाही आणि हे सर्व महापुरुष कर्तुत्वाने मोठे होते. ह्या महापुरुषांच्या
कर्माची उंची हि अवकाशाला लाजवणारी होती.
जय जिजाऊ
जय शिवराय
..ණ मनोज गुजर दि– ०९/०६/२०१३
