Monday, 24 June 2013

वस्तुस्थिती


समजत नाही कि, लोकांना वस्तुस्थिती मान्य का नसते..?.

आज तीर्थक्षेत्रांवरचा चाललेला गोंधळ जर कोणी दाखवला तर लोक त्याला विरोध करून म्हणतात कि, नाही ती आपली संस्कृती आहे. आपला धर्म आपल्याला शिकवतो कि, तीर्थक्षेत्रांवर दान धर्म करावा. पण हे सर्व आपण नाही बोलत असतो हे बोलणाऱ्यांनी लक्षात असू द्या. तर हे लहान पणापासून आपल्या मनावर झालेले संस्कार बोलत असतात. आज तीर्थक्षेत्रांवर श्रद्धेचा फक्त लिलाव चालू आहे आणि हि वस्तुस्थिती आहे. कधीतरी सर्वे करा, तुम्हाला दिसून येईल कि, तीर्थक्षेत्रांवर असलेल्या पुजाऱ्यांची आज करोडो रुपयाची मालमत्ता आहे.  

अलीकडचीच घटना आहे कि तिरुपती तीर्थक्षेत्राला केसांच्या लिलावातून ७० कोटीचा फायदा झाला (हे वृत्त सकाळ वृत्तपत्रातून समोर आलेलं वृत्त आहे माझ्या मनाचं नाही.). आम्ही तिरुपतीला जाऊन श्रद्धेने केस दान करतो आणि त्या श्रद्धेचा हे लोक लिलाव करतात काय म्हणावं ह्या सर्व गोष्टीला…?. श्रद्धेचा लिलाव कि लिलाव झालेली श्रद्धा..?. 

शिर्डी ज्या साईबाबांनी आपलं आयुष्य हे समाज सुधारणेकरिता, समाज प्रबोधनाकरिता व गोर गरीब जन माणसांकरिता खर्च केले त्याच साईबाबांना आम्ही सोन्याच मुकुट चढवतो, लाखो रुपयाच्या दागिन्यांनी मढवतो आणि दर्शनाचे V.I.P तिकीट ठेवतो ह्या सर्व घटनेला काय म्हणावे?.
 
एकीकडे आई बापाला वृद्ध आश्रमाच्या वाटा दाखवणारे गबाळ दुसरीकडे देवावर अथांग श्रद्धा असल्याचा गाजावाजा करतात आणि हिंदू संस्कृतीचा इतिहास सांगतात. ज्या हिंदू संस्कृतीचा आणि देव ह्या संकल्पनेचा पाया असलेले आई बाप आम्ही नीट सांभाळू शकत नाही तर देव हा शब्द उच्चारण्याचा आम्हाला तीळ मात्र अधिकार नाही हे पहिले लक्षात असु द्या. जगात पहिला गुरूचा मान हा आई बापाला आहे हे ध्यानात असू द्या.

आजच्या धकाधकीच्या, स्वार्थी जगात कसली आली श्रद्धा. आपणच एकदा एकांतात विचार करा किआपण खरच देवाला अनन्यभावाने शरण येतो का?. कि, स्वार्थीपोटी देवाला भजतोय...?. रात्री दारू पिऊन आलेला माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी ताजातवाना होऊन देवाला भजतो हि कुठली आली श्रद्धा?. आई बापाला शिव्या घालणारा आणि आई बापाला घरातून हुसकावून लावणारा माणूस देवाला भजतो हि कुठली आली श्रद्धा?. वेळप्रसंगी आई बापाला सुद्धा मारणारा माणूस देवाच्या गाभाऱ्यात जाऊन देवाला भजतो हि कुठली आली श्रद्धा..?. ह्या सर्व प्रश्नांचा एकदा विचार करा .

ते इंग्रज भारतासमोर पाव वाटा सुद्धा नसणारा त्यांचा देश पण सुपीक विचारांच्या आणि सुलभ बुद्धीच्या वापरावर त्यांनी भारतासारख्या विशाल देशावर १५० वर्ष राज्य केले हा सर्वात मोठा पुरावा आहे सुपीक विचारांचा आणि सुपीक बुद्धीचा. जर त्यांनी त्यांच्या आयुष्याचा निर्णय जोतिषाच्या हातात किंवा देवाच्या पायावर सोडले असते तर हे सर्व शक्य झाले नसते. आज त्या गोऱ्या वर्णीय लोकांच साम्राज्य जगभर पसरलं आहे ते फक्त सुपीक विचारांच्या जोरावरच .

पण भारतासारखा विशाल क्षेत्रफळ असलेला देश मात्र अंधश्रद्धेचा व जोतिषांचा बळी ठरला आहे. श्रद्धा ठेऊ नये असं अजिबात नाही शिवाय भारताच्या राज्यघटनेत श्रद्धा ठेवण्याचा व असण्याचा प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहे. 

शेवटी एकच सांगतो मी सुद्धा हिंदू आहे व मी माझ्याच धर्माबद्दल बोलू शकतो. कारण दुसऱ्याचं घर स्वच्छ करून स्वतःच्या घरात पसारा ठेवण्यात काही एक अर्थ नसतो म्हणून पहिले स्वतःच घर स्वच्छ करतो आहे. शिवाय माझा कोणालाही विरोध नाही तर वस्तुस्थिती दाखवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. तीर्थक्षेत्रांवर पैशांचा ढीग रचण्यापेक्षा आणि पुजाऱ्यांची तिजोरी भरण्यापेक्षा तोच पैसा सत्कर्मासाठी वापरा, चांगल्या कार्यासाठी वापरा, अनाथ आश्रमात अनाथ मुलांकरिता वापरा, गोरगरीबांच्या पोटासाठी वापरा देव तुम्हाला माणसातच मिळेल.

विश्वास ठेऊ नका पण विचार मात्र नक्की करा. आवड आपलीच आणि निवड सुद्धा आपलीच. पटलं तर स्वीकारा नाहीतर पूर्णविराम घ्यावा कुठलाही आग्रह नाही.


.. मनोज गुजर दि– २५/०६/२०१३    

Sunday, 9 June 2013

महापुरुषांचा इतिहास व स्मरण.


महाराष्ट्रात जन्मलेल्या महापुरुषांचा, युग पुरुषांचा इतिहास शिवाय त्यांचे कर्म व शिकवण विसरलेल्या सुशिक्षित, तरुण पिढीला ह्या महापुरुषांच्या कर्माची जाणीव करून देण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे.

प्रथमतः एक सांगतो कि, जात आणि धर्म मानव निर्मित आहे ईश्वर निर्मित नाही. म्हणून माणसाचा जातीनुसार आदर करू नका तर त्याच्या कर्माचा, कर्तुत्वाचा व विचारांचा आदर करा. ह्या महापुरुषांनी, युग पुरुषांनी स्वतःचे आयुष्य हे समाज सुधारणेसाठी व जन हितासाठी खर्ची केले. त्यांच्या ध्यानी मनी फक्त जनकल्याण व जनहितच होते. जणू ते जन कल्याणाला जीवन आणि स्वार्थाला मरण मानणारे महामानव होते. आयुष्य कर्माच्या अलंकारांनी शोभून दिसते हीच त्यांची शिकवण होती. मेलेल्यांसारखं जीवन जगण्यापेक्षा एक दिवस तरी सूर्या सारखे तळपून अस्तास जा असले संस्कार दुध पाजणारे हे महापुरुष होते. 

पण आज आमचं दुर्देव कि, आम्ही ह्या महापुरुषांना वेगवेगळ्या जातीत गुरफटून टाकले आणि त्यांचे कर्म विशिष्ट जातीपुरताच मर्यादित ठेवले. जसे महात्मा फुले माळी समाजाचे, अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे, गाडगेबाबा परीट (धोबी) समाजाचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजाचे, छत्रपती शिवराय मराठ्यांचे असले वर्गीकरण करून आम्ही ह्या महापुरुषांच्या कर्माला, कर्तुत्वाला व विचारांना कायमचा थांबा आणला.
आमचं दुर्दैव इतकं कि, आज आमच्या पिढीला, सुशिक्षित वर्गाला ह्या महापुरुषांची चेहऱ्याने सुद्धा ओळख पटत नाही इतकी खालावली आहे आमची संस्कृती. आजच्या पिढीला ह्या महापुरुषांच्या शिकवणी पासून, त्यांच्या इतिहासापासून वंचित ठेवायला आमचे आई वडीलच जबाबदार आहेत. कारण आमचे आई वडील आम्हाला लहानपणापासूनच ह्या महापुरुषांची ओळख जातीच्या वर्गीकरणानुसार करून देत आहेत. 

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, आपल्या कर्माने कर्मवीर ठरले आणि आजही जगासमोर कर्मवीर ह्या नावानेच त्यांची ओळख पटते. महारा-मांगाच्या पोरांना शिकवणारा हा देवमाणूस होता. जणू माणसातला देव ह्या महापुरुषाने जाणला होता आणि आज आम्हाला ह्या महापुरुषाची चेहऱ्याने सुद्धा ओळख पटायची नाही इतका कोप झालाय आमच्या संस्कृतीचा. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, फक्त नावानेच शाहीर नव्हे तर कर्माने शाहीर असलेला हा महापुरुष होता. ज्याने अंधश्रद्धा दूर करून बहुजानामध्ये ज्ञानाचे बीज पेरले. पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे असला संदेश पोहचवणारा हा महापुरुष होता आणि ह्या महापुरुषाला आज आम्ही मातंग समाजापुरता मर्यादित ठेवले.

डॉ. पंजाबराव देशमुख, ह्या महापुरुषाने दलित वर्गाला उच्च शिक्षणाची पायरी दिली. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मुलमंत्र दिला.

संत गाडगे महाराज, ह्या महापुरुषाने नेहमी माणसातच देव पहिला आणि जाणला. कर्माला देव मानणारा आणि कार्मालाच पूजणारा हा महापुरुष होता. उत्तम कर्म हाच माझा धर्म मानणारा हा महान संत, महान समाजसेवक होता. 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ह्या महापुरुषाने भारताची राज्यघटना लिहिली आणि सामन्य माणसापरियंत कायदा पोहचवला. संपूर्ण आयुष्य ह्या महापुरुषाने समाज सुधारणेकरिता खर्ची घातले आणि आज त्याच महापुरुषाच्या स्मारकाकडे आम्ही तिरक्या तिरस्कारी नजरेने पाहतोय, हि किती मोठी शोकांतिका आहे.     

छत्रपती राजर्षी शाहू महाराज, ह्या राजाला आरक्षणाचे जनक म्हटले जाते. आज आम्हाला जे आरक्षण मिळते ते ह्याच राजामुळे हे आम्हाला पहिले ठाऊक असले पाहिजे. ह्या राजाने सर्व धर्मासाठी लढा दिला होता. हा राजा सर्व धर्माला एक समान प्राधान्य द्यायचा.   

महान संत तुकडोजी महाराज, ह्या संताने दान घेण्यासाठी हात पसरू नका तर दान देण्यासाठी हात वर करा हा संदेश जन मानसात पोहचवला. सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारे, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारे, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारे, सर्व धर्म सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारे, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज. 

विश्व वंद्य महात्मा जोतीबा फुले आणि विद्या ज्योती सावित्री आई फुले हि जन माणसात विद्येचे बीज पेरणारी सुवर्ण जोडी होती. महात्मा जोतीबा फुले घर घरात जाऊन शिक्षणाचे महत्व पटवून देत असायचे. गोर गरीब, दिन दुबळ्या परियंत शिक्षणाचा प्रसार ह्या महापुरुषाने केला होता. ह्या महापुरुषाने १ जानेवारी १८४८ साली पुण्यामध्ये मुलींसाठी भारतातली पहिली शाळा सुरु केली म्हणून आज आमच्या माता भघिनी उच्च शिक्षित आहेत हे आमच्या माता भगिनींनी लक्षात ठेवायला  पाहिजे. 

विद्या ज्योती मानली जाणारी सावित्री आई फुले, ह्या मातेने अपमानाचे वार झेलून मुलींमध्ये  शिक्षणाचे बीज पेरले आणि आमच्या माता भगिनींना शिकवले हे आमच्या सुशिक्षित, तरुण वर्गाने लक्षात ठेवायला पाहिजे. हि सुवर्ण जोडी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची कुलपती मानली जायची. इतकी थोर कामगिरी होती ह्या सुवर्ण जोडीची. 

शेवटी एकच सांगतो माणूस हा कर्तुत्वाने मोठा ठरतो वयाने नाही आणि हे सर्व महापुरुष कर्तुत्वाने मोठे होते. ह्या महापुरुषांच्या कर्माची उंची हि अवकाशाला लाजवणारी होती.  





जय जिजाऊ
जय शिवराय 

.. मनोज गुजर दि– ०९/०६/२०१३   

Sunday, 2 June 2013

शिवरायांचा ईतिहास सर्वसामान्य मानसापरीयंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.


आज खूप लाजिरवाणी परिस्थिती आमच्या नजरेसमोर उभी ठाकली आहे. ज्या राजाने आमच्यासाठी रक्ताच पाणी केलं. आयुष्याच्या चिंध्या चिंध्या केल्या. तलवारीच्या वारांचा शृंगार परिधान केलाज्याने तलवारीच्या पात्यावर मरण पेलले. जो राजा २४ तासापैकी १७ तास घोड्यावर जीव मिरवत फिरला. मान अपमानाची कधी पर्वा केली नाही. उभं आयुष्य आमच्यासाठी खर्ची घातले आणि शेवटी ह्याच मातीत शेवटचा श्वास घेतला त्याच शिवरायांचा आम्हाला विसर पडावा. इतकेच नाही तर आमचा सुशिक्षित वर्ग शिवरायांना काही विशिष्ट राजकारणी पक्षा पुरताच मर्यादित ठेवतोय, एखाद्या जाती पुरताच मर्यादित ठेवतोय इतका कोप झालाय आमच्या संस्कृतीचा, विचार क्षमतेचा व बुद्धिमत्तेचा.
 
मराठा म्हणजे काय...?
इतिहासाला विसरलेला आमचा सुशिक्षित वर्ग, तरुण वर्ग हा "मराठा" ह्या शब्दाला विशिष्ट जातीपुरताच मार्यादीत ठेवत आहे. प्रथमतः मराठा हि कुठलीही जात नसून एक "पदवी" आहे हे पहिले लक्षात असू द्या. पण आमच्या सुशिक्षित, तरुण वर्गाची विचार क्षमता इतकी खालावली आहे कि ते "मराठा" हि जात समजून शिवराय हे फक्त मराठा जातीचेच आहेत असा ग्रह निर्माण करून ह्या थोर योध्याच्या पराक्रमाला पाठ फिरवत आहेत व त्या थोर योध्याचे आमच्यावर असलेल्या अथांग उपकराला विसरत आहेत. मराठा ह्या पदवीला आपल्या जाती इतकेच पवित्र समजनाऱ्यांनी मराठा ह्या पदवीला जातीचा अलंकार चढवून स्वतःला मराठा जातीचे म्हणवून घेतले हि वस्तुस्थिती आहे मराठा ह्या शब्दा मागची.


शिवराय कोण होते...?
शिवराय हे हिंदू होते. हिंदू असून सर्व धर्मचा आदर करणारे धर्म सहिष्णू होते. सुपीक विचारांचे कौशल्यपूर्ण शूर योद्धा होते. तसेच शिवरायांचे कार्य हे फक्त महाराष्ट्रा पुरताच मर्यादित नसून संपूर्ण भारतासाठी त्यांनी झुंज दिली होती. भारतात राजे बरेच होऊन गेलेत शिवाय त्यांची कामगिरी सुद्धा खूप धाडसी, हृदयाच्या ठोक्यांना धड धड्विणारी होती. पण शिवराय प्रत्येक क्षेत्रात निपुण आणि तरबेज असणारा एकमेव राजा होता. हा राजा महाराष्ट्रात जन्माला आणि आमच्या सुशिक्षित, तरुण वर्गाने शिवरायांना महाराष्ट्रा पुरता, विशिष्ट जाती पुरता मर्यादित ठेवून त्यांच्या विचारांना, पराक्रमाला आणि इतिहासाला सामान्य माणसापरियंत पोहचू दिले नाही हि वस्तुस्थिती आहे. 

स्वराज्य म्हणजे काय...?
स्वराज्य ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे स्वतःचे राज्य. शिवरायांनी मोघल काळात इथल्या रयतेवर, शेतकरी, गोर गरीब कुटुंबावर होणारे अत्याचार डोळ्यांनी पहिले होते आणि एकमेव निश्चय करून संपूर्ण आयुष्य हे रयतेला स्वतंत्र मिळावं, ताठ मानेने जगण्याचा वसा मिळावा, रयतेच स्वतःच राज्य असावं म्हणून स्वराज्य निर्मितीसाठी वाहिले, रयतेच्या कल्याणासाठी वाहिले. म्हणून स्वराज्याचा प्रारंभ हा ई.स १६४८ साली फत्तेखानाच्या बाळाजी हैबतरावाचा शिरवळ येथे  पराभव करून केला. असा परमार्थाचा विचार बाळगणारा हा राजा होता कि, जाने कधीहि स्वार्थाची अपेक्षा मनी बाळगली नव्हती.

शिव राज्यभिषेक म्हणजे काय...?.
शिव राज्यभिषेक म्हणजे त्या दिवशी शिवरायांनी स्वराज्याच्या मदतीस, राज्यकारभाराच्या मदतीस अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती आणि त्या मंडळाचे प्रमुख शिवराय होते. पण शिवरायांनी प्रमुख होण्याचा मान स्वतःहून न स्वीकारता १८ पगड जातीच्या सहमताने स्वीकारला होता. शिवराय म्हणायचे कि श्रींच्या कृपेने राज्य मिळाले, हे राज्य श्रींचे आहेम्हणजेच हे राज्य जनतेचे आहे असा उल्लेख राजांनी केला. म्हणून शिवरायांनी आपल्या राज्याचे नावही हिंदवी स्वराज्य असे ठेवले. हिंदवी याचा अर्थ हिंदूंचे असा नसून त्याकाळी हिंदवी या शब्दाचा अर्थ भारतीय असा करण्यात येई. म्हणून ६ जून ई.स १६७४ ला शिव राज्यभिषेक सोहळा थाटात पार पडला. पण तेव्हा राजे ३२ मनी सिंहासन पाहून थोडे स्तब्द झाले आणि म्हणाले हे सिंहासन खूप मोठे पाहिजे कि जेणेकरून माझ्या १८ पगड मावळ जातीमधल्या प्रत्येक मावळ्याला त्यावर बसता येईल. ह्या सिंहासनाचा मी एकटा मानकरी नाहीच हि भावना त्या थोर योध्याची होती.

सदर माहिती हि आमच्या सुशिक्षित, तरुण वर्गाला विसर पडलेल्या इतिहासाची, शिवरायांची, शिवरायांच्या कर्तुत्वाची, पराक्रमाची जाणीव करून देण्याकरिता सादर केली आहे. 
(एकच विनंती कि शिवरायांना कुठल्याही जाती पुरता, पक्षा पुरता, राष्ट्रा पुरता मर्यादित ठेऊ नका तर शिवरायांना व शिवरायांच्या इतिहासाला सामान्य माणसापरियंत पोहचवा.) 

शिवरायांची प्रशासनव्यवस्था व अष्टप्रधानमंडळ खालील चित्रात दाखवले आहे.


.. मनोज गुजर