Thursday, 18 October 2012

राजं तुम्हासनी आई भवानीची आण हाय.


राजं या कि पुन्हा जन्माला, राजं आई भवानीची आण हाय तुम्हास्नी, पुन्ह्यांदा जन्माला या राजं 

राजं, राजं म्या...म्या हाय कि तुमच्या संग, कायभी कराया तयार हाय, फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं.
राजं म्या फितूर नाय व्हनार राजं. राजं तुमची आण घेतूया मंग इथल्या दगडाशी भी खोट नाय बोलायचो म्या. राजं म्या लढीन त्या १२ मुल्काचा १८ पगड जातीचा मावळा होवुन, फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं.

राजं जाऊ की, मग संग किल्ले जंजिरास्नि जिंकाया. राजं म्या....म्या खेळीन की रक्ताची रंगपंचमी, तुम्हास्नी कायभी नाय करू द्यायचा राजं, राजं हाय माझ्यात ताकद पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं.  

राजं म्या होईन त्यो बाजी, जीवाची बाजी लावून त्यानं तुम्हास्नी सुखरूप ठेवलं. राजं म्या लावीन कि माझ्या जीवाची बाजी, फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 


राजं म्या होईन त्यो दर्या सारंग, अशी जरब बसविन राजं समुंदरावर कि, समुंदराचं पाणी भी चळा चळा कापाया लागल, पण राजं फकस्त तुम्ही जन्माला या राजं. 


राजं...म्या, म्या होईन त्यो नूरखान बेग ज्यानं खरा धर्म ओळखीला. राजं...राजं म्या एकटा भारी पडल राजं सर्वास्नी, फकस्त राजं तुम्ही जन्माला या राजं.  

राजं म्या होईन त्यो कान्होजी जेधे, नेहमी तुमचीच बाजू मांडाया, राजं मग अशी भी जरब बसविन शत्रूवर कि, पुन्हा महाराष्ट्रात फिरकायचा नाही. पण राजं फकस्त तुम्ही जन्माला या राजं.  

राजं म्या होईन त्यो जिवाजी महाल, त्यो रांगड्या धडाचा, मदमस्त चालीचा अन अफाट ताकदीचा असं भी गनिमाला ठार करीन राजं कि, त्यो पुन्हा वाटेला यायचाच नाय. पण राजं फकस्त तुम्ही जन्माला या राजं.  

राजं म्या होईन त्यो बाजी प्रभू, जीवाची बाजी लावाया. असा भी रडविन त्या मृत्यूला कि, त्यो लाख पस्तावीन राजं. पण राजं फकस्त तुम्ही जन्माला या राजं. 

राजं म्या होईन त्यो बहिर्जी नाईक, जणू तुमचा तिसरा डोळाच, राजं असं भी शत्रूला फाडीन कि, त्याला ठिगळ लावाया कुठभी जागा उरणार नाय. पण राजं फकस्त तुम्ही जन्माला या राजं. 

राजं म्या होईन कि, त्यो मुरारबाजी, नंग्या तलवारी नाचविणारा, मृत्यूला पळविणारा अन वेळ प्रसंगी जीव भी देणारा. व्हय राजं म्या होईन त्यो. पण राजं फकस्त तुम्ही जन्माला या राजं. 

राजं म्या होईन त्यो हिरोजी त्योच मदारी मेहतर, तुम्हास्नी सुखरूप बाहेर काढाया खुद्द यमाच्या दरबारात उभा ठाकलेला. होय म्या उभा ठाकीन राजं यमाचा दरबारात, तुमच्यासाठी कायभी करीन. पण राजं फकस्त तुम्ही जन्माला या राजं. 

राजं त्यो नाय का तान्हा होय त्योच तान्हाजी, व्हय व्हय...म्या होईन कि त्यो तान्हाजी. तुमचा सवंगडी, जो पोटच्या पोराचं लगीन न लावता कोंढाण्याचं लगीन लावाया गेला तर त्यो पुन्हा घावलाच नाय. होय राजं म्या करीन तशी जिगरबाज झुंज. पण फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

राजं म्या होईंन कि, त्यो शेलाराम ८० वर्षाच 
तरुणास्नी भी लाजवणारं ते रांगड शरीर. व्हय राजं म्या होईन कि, त्यो. पण फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

राजं म्या होईन कि त्यो सूर्याजी, आपल्या तान्हा चा भाऊ ज्यानं जिगरीनं सिंदगड जिंकला. व्हय राजं मला भी व्हायचं राजं तसं, जिगरीनं जिंकायचय राजं तसं, तुमच्यासाठी काहीतरी करायचंय राजं, पण फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

राजं म्या होईन त्यो नेताजी, नेताजी पालकर, म्या होईन त्यो कडतोजी. जो आपल्या प्रतापान प्रतापराव झाला अन तुमच्यावर त्यानं जीवापाड प्रेम केलं. व्हय राजं म्या होईन त्यो प्रतापराव. पण फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 


राजं म्या होईन त्यो सिद्धी हिलाल, जो वाऱ्यासारखा आला अन वेडात विर झाला. राज म्या होईन कि तसा, पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

राजं...राजं....म्या होईन....व्हय, म्या होईन त्यो हम्बीराव, ज्यानं अफजल्ल्याच्या वेळला ६०० गनिमांना नर्क दाखिवला. व्हय राजं म्या होईन त्यो. पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

राजं म्या होईन त्यो हिरोजी...हिरोजी इंदूलकर, ज्यानं आपली जमीन विकून राजधानी बांधून काढलीया. व्हय राजं म्या होईन त्यो, पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

राजं, राजं म्या....म्या होईन कि, त्यो...त्यो शिवा काशीद. राजं त्यो जन्मला जरी शिवा काशीद असला तरी मरतांना मात्र शिवाजी महाराज म्हणून गेला हे भाग्य का कोनलाभी लाभतं व्हय. राजं म्या मरीन कि शिवाजी महाराज म्हणून. पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

राजं पुन्हा त्या अफजल्ल्याला फाडू राजं अन व्हय राजं त्या कृष्णाजीला असा भी उडवितो राजं, कि पुन्हा ३५० वर्ष जन्म घ्यायचा नाही त्यो. राजं तुम्हास्नी काय भी नाय करू द्यायचा म्या. पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

अन व्हय राजं त्यो औरंग्या राहिलाच कि, या राजं, इतका फाडू राजं औरंग्याला इतका फाडू कि, त्याला ठिगळ लावाया जागाच उरायची नाय इतका फाडू. राजं आपल्या शंभू राजांची पुरी तहान भागवू इतका फाडू राजं. पण फकस्त राजं तुम्ही पुन्हा जन्माला या राजं. 

मग राजं येताय नव्ह म्या होईन ना राजं त्यो १२ मुल्काचा १८ पगड जातीचा मावळा. राजं तुम्हास्नी आई भवानीची आण हाय. तुम्हास्नी यावच लागल. म्या तुमची वाट पहातुया राजं. राजं या मंग लवकर म्या हायच तुमच्या संग...!! 


.. मनोज गुजर 

Monday, 15 October 2012

शिवराय जन्माला येण्यासाठी जिजाऊ जन्मली पाहिजे.


आम्ही खूप अभीमानाने म्हणतो कि, "राजे पुन्हा जन्माला या" पण इथे जिजाऊ तरी कुठे जन्मली आहे तर, राजे जन्माला येतील. आजच्या मराठ मोळ्या मुली आता पहिल्या सारख्या राहिल्यात तरी कुठं तर, जिजाऊ घडेल व जन्माला येईल.

आजच्या मराठ मोळ्या मुलींना नट नट्यांचा इतका नशा चढलाय कि, त्या मराठ मोळ्या मुली नट नट्यांचा धुंदीत आमचा इतिहास विकायला निघाल्या आहेत. आजच्या मराठ मोळ्या मुलीला ऐश्वर्याचं पूर्ण नाव ठाऊक असतं शिवाय ऐश्वर्याच्या मुलीचा जन्मदिवस ह्या नोंद करून ठेवतात. 
पण त्यांना आई जिजाऊचा जन्मदिवस ठाऊक नसतो. ते तर सोडाच त्यांना जर शिवरायांच पूर्ण नाव विचारलं तर त्या एकमेकांच्या तोंडाकडे पाहत हसत म्हणतातजा रे इतकं नाही माहित” तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.

आई जिजाऊ स्वराज्याला सौभाग्य आणि सौभाग्याला स्वराज्य मानायच्या. पण आजची मराठ मोळी मुलगी प्रियकराला सर्वस्व आणि सौभाग्य मानते 
तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.

आई जिजाऊने भाळावर कुंकू लाऊन त्याला जपायचे कसे हा कान मंत्र स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला दिला. पण अजची मराठ मोळी मुलगी समाजात सावत्र भाळ असल्यागत वावरत आहे तर, ती कुठून स्वत:चे रक्षण करणार व कुठून तिचं कुंकू जपणार तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.

आई जिजाऊनी स्वाभिमान आणि स्वराज्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे प्रत्येक स्त्रीच्या मनात कोरून दिले होते. पण आजची मराठ मोळी मुलगी ते नाणंच हरवून बसलीये तर तिला कुठून राहणार स्वाभिमान तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.

आई जिजाऊ यांनी शत्रूला डोळ्यात कसे बसवायचे आणि त्याला त्याची जागा कशी दाखवायची याचं शीक्षण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला बहाल केले होते. पण आजची मराठ मोळी मुलगी शत्रूचा काटा काढण्यासाठी प्रियकराची मदत घेतेय तर ती काय दाखवणार शत्रूला त्याची जागा तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.

आई जिजाऊ शिवरायांना गडकाठी नेऊन स्वराज्याचा विस्तार दाखवायची व सोनेरी स्वराज्य उभारण्याची स्वप्न रंगवायची. पण आजची आजची मराठ मोळी मुलगी समुद्रकाठी प्रियकराचा हातात हात घेऊन प्रेमाचा विस्तार वाढवत व प्रेमाची स्वप्न रंगवत बसली आहे तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.
 
आई जिजाऊने संपूर्ण आयुष्य संस्कार देण्यात व स्वराज्य घडविण्यात खर्ची घातले ते केवळ आम्हाला ताठ मानेने जगण्याचा वसा मिळावा म्हणून. पण आजच्या मराठ मोळ्या मुली आई जिजाऊचे हे अथांग उपकार कधीच विसरल्या आहेत तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.
 
आजची मराठ मोळी मुलगी पाश्च्यात्य संस्कृतीचा इतका अवलंब करतेय कि, तीला भान नाही तिच्या अब्रूची, तिला भान नाही आपल्या जातीची, तिला भान नाही आपल्या कुळाची, तिला भान नाही आपल्या संस्कृतीची तर, कशी काय जिजाऊ घडेल व जन्माला येईल.

तर आजच्या मराठ मोळ्या मुलींना एकच विनंती करतो कि, आपल्या जातीचं, कुळाचं, संस्कृतीचं भान ठेवा. राजे शिवरायांचं, आई जिजाऊचं अस्तित्व नेहमी जागृत ठेवा. तरच समाजात आई जिजाऊ घडेल आणि पुन्हा राजे जन्माला येतील. 

.. मनोज गुजर 

राजे शरीरात त्राण असेपर्यंत तुमच्या चरणावर नतमस्तक होईल.


राजे आम्ही जय शिवराय म्हणतांना अस म्हणतो कि, तो आमचा हक्कच आहे. पण राजे ते मुळात तेवढ्या पुरताच मर्यादित ठेवणारी आमची स्वार्थी मंडळी आहे. हे असलं स्वार्थी खंजीर बाळगणारे काय तुमचा हक्क गाजवणार राजे आणि काय सोनेरी स्वराज्य नव्याने उभारणार.

राजे आज मी तुम्हाला काळजातलं एक गुपित सांगतो.

निर्मात्याने आम्हाला डोळे दिलेत... 

पण आज आम्ही ह्या डोळ्यांनी मुक्या प्राण्यांची कत्तल होताना पाहतोय.
आम्ही ह्या डोळ्यांनी भुकेल्या जीवाला तरफडतांना पाहतोय.
ह्या जहरी नजरेने आई बहिणीची अब्रू लुटतोय.
ह्या डोळ्यांनी आपल्याच माणसावर आग ओकतोय.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, ह्याच डोळ्यांनी तुम्ही अफजल रडवलाय,
सारा मुघल पळवलाय.
ह्याच डोळ्यात तुम्ही आऊ साहेबांना सोनेरी स्वराज्य दाखवलं होतं.
ह्याच डोळ्यांनी तुम्ही स्वराज्यावर प्रेम ओतले होते.
म्हणून राजे तुम्हाला नमून एकच मागतो की, माझ्या डोळ्यांना तुमच्या सोनेरी रूपाचं दर्शन स्वप्नात तरी होऊ द्या. 

निर्मात्याने आम्हाला कान दिलेत...

पण आज आम्ही ह्या कानाचा वापर आमच्याबद्दल होणारी स्तुती ऐकण्यासाठी करतोय.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, ह्याच कानाने तुम्ही शत्रूच्या मांजर पावलांचा आवाज ऐकून स्वराज्याला सुरक्षित ठेवले होते.
ह्याच कानाने तुम्ही शत्रूकडून तुमचा झालेला अपमान पचवून रयतेला गुळाचा गोडवा दिला.
ह्याच कानाने तुम्ही, आई जिजाऊने शिकवलेले गनिमाचे धडे काळजीपूर्वक ऐकले होते.
ह्याच कानाने तुम्ही रयतेच्या काळजातले दुख ऐकले होते.
राजे तुम्हाला नमून एकच मागतो कीमाझ्या कानांना तुमच्या पवित्र नामाचा जप ऐकण्याचा नाद लागू द्या.
माझ्या कानात आई जिजाऊचे संस्कार विचार घुमू द्या, घोड्याच्या टापांचा आणि हर हर महादेवाचा गजर चिरायू होऊ द्या.

निर्मात्याने आम्हाला नाक दिले...

पण आम्हाला आज "जय शिवराय" म्हणायला सुद्धा नाक राहिले नाहीये इतकी आमची दयनीय अवस्था झाली आहे.
आमच्या नाकात सुवास दरवळतोय मुक्या प्राण्याच्या शिजवलेल्या मटणाचा.
आमच्या नाकात सुवास दरवळतोय मदमस्त मद्याचा.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, तुम्ही मातीला मुठीत घेऊन मातीच्या वेदना व दुखं हे मातीच्या येणाऱ्या सुवासाने जानत असत.
राजे तुम्हाला नमून एकच मागतो किमाझ्या नाकाला तुमच्या चरणाने मंगलमय झालेल्या मातीच्या सुवासाची ओढ असू द्या.

निर्मात्याने आम्हाला मुख दिले....

पण आज आम्ही ह्या मुखाचा वापर फक्त याची अडवा त्याची जिरवा ह्या दहाकलमी उद्योगासाठी करतोय.
ह्या मुखात आम्ही शिव्यांचा इतका साठा भरून ठेवतोय की एकवेळ पृथ्वी तलावर सर्व गोष्टी संपतील पण आमच्या मुखातील शिव्यांचा साठा मात्र चिरायू राहील.
ह्याच मुखाने आज आम्ही जहर ओकतोय ह्या पवित्र स्वराज्यात.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, ह्याच मुखाने तुम्ही रसाळ गोडवा ओतला होता रयतेच्या हृदयात.
ह्याच मुखाने तुम्ही स्वराज्य उभारण्याची शपत घेतली होती.
ह्याच मुखाने तुम्ही सह्याद्रीत हर हर महादेव चा गजर केला होता.
ह्याच मुखाने तुम्ही हिरकनीला आई म्हणून हाक मारली होती.
म्हणून राजे तुम्हाला नमून एकच मागतो कीमाझ्या मुखात जय शिवराय हेच पवित्र नाम सदैव नाद करू द्या, 
माझ्या मुखातून जय भवानीची किलकारी सदैव बाहेर निघू द्या.

निर्मात्याने आम्हाला हात दिलेत...

पण ह्या हातांनी आज आम्ही काय पाप करतोय याचा हिशेब नाही.
राजे ह्याच हातांनी आम्ही लाख जीव घेतोय.
ह्याच हातांनी गरीबाचा पैसा खिचात घालतोय.
ह्याच हातांनी दारूचा प्याला आम्ही ऐटीत धरतोय.
आई वडिलांनी कमावलेला घामाचा पैसा आम्ही, ह्याच हातांनी सिगरेटच्या धुव्यात विलीन करतोय.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, तुम्ही ह्याच हाताच्या जोरावर आम्हाला महाराष्ट्रासारखा राजवाडा बहाल केला.
ह्याच हातांनी भवानी तलवार चालवली होती.
ह्याच हातांनी तुम्ही अफजल फाडला होता.
राजे तुम्हाला नमून एकच मागतो की, माझ्या हाताला तलवारीचा स्पर्श लाभू द्या, 
तुमच्या चरणाला स्वप्नात तरी स्पर्श होऊ द्या.

निर्मात्याने आम्हाला पाय दिलेत...

पण त्या पायांनी आज आम्ही कोनालाही तुडवत निघालोय.
ज्या आई बापांनी आम्हाला जग दाखविले त्याच आई बापांना आज आम्ही ह्याच पायांनी लाथ मारतोय.
ह्याच पायांनी आम्ही कुणाच्याही नरडीचा घोट घ्यायला तयार आहोत.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, ह्याच पायांनी तुम्ही मुघलांना तुडवले होते.
ह्याच पायांनी तुम्ही सह्याद्रीला शोभित केले होते.
म्हणून राजे तुम्हाला नमून एकच मागतो कीमाझ्या पायांना स्वराज्यासाठी धावण्याची ताकद मिळू द्या. 

निर्मात्याने आम्हाला हृदय दिले...

पण आमच्या हृदयात फक्त प्रीयसीचे बोल आणि प्रीयसिचेच गीत पसारा मांडत असतात.
आमच्या हृदयात नट नट्याची स्वप्न असतात.
पण राजे आम्ही हे विसरतोय की, तुम्ही ह्या हृदयात अनेक दुखं ठेऊन रयतेला आनंद दिला होता.
तुम्ही स्वराज्यात प्रेमाची हृदये उभे केली होती.
तुम्ही आई जिजाऊचे संस्कार हृदयातून जपले होते.
राजे तुम्हाला नमून एकच मागतो की, माझ्या हृदयात तुमचीच मूर्ती असू द्या.
ह्या माझ्या हृदयात आई जिजाऊचे निखळ रूप नाद करू द्या आणि राजे, ज्या दिवशी ह्या हृदयाला तुमचा विसर पडेल त्याच दिवशी माझ्या देहाची राख होऊ द्या.

राजे धडाच्या प्रत्येक अवयवाचा वापर हा मी धडात जीव असेपर्यंत तुमच्या सेवेत करणार.

.. मनोज गुजर