Wednesday, 23 July 2014

समाज


समाज म्हणजे काय...?? 

समाज म्हणजे समज नसलेला कि, समजून न घेणारा..?, माणसाची किंमत हरवलेला व पैशाला किंमत देणारा समुदाय म्हणजे समाज. गरिबाला कावडी मोल समजणारा व श्रीमंताला डोक्यावर घेऊन मिरविणारा म्हणजे समाज. तोंडावर खोटी स्तुती करणारा व माघारी निंदा करणारा समुदाय म्हणजे समाज. माणूस मनाने कितीही श्रीमंत असला तरी त्याला किंमत नाही पण त्याचा खीचा हा पैशाने गरम हवा हि संकल्पना बाळगणारा समुदाय म्हणजे समाज असतो. 

समाजात समर्थक व विरोधक असे दोन गट असतात व आपण कोणत्या गटात जायचं हे दुसरा तिसरा कोणी न ठरवता आपणहून ठरवत असतो. आपणच आपली गटानुसार विभागणी करत असतो. जर कुणाबद्दल चार लोकं निंदा करत असतील व ज्या व्यक्तीबद्दल ते निंदा करत असतील आणि जर तो व्यक्ती आपला विरोधक असेल तेव्हा आपण त्या चार लोकांना शामिल होतो व आपण आपली समज करतो कि, हा आपलाच गट आहे. अश्या प्रकारे समाजात समर्थक व विरोधक अश्या दोन गटाची निर्मिती होते आणि स्त्रिया व माणसांची गटानुसार विभागणी होत असते हि वस्तुस्थिती आहे. 

तसेच गटानुसार लोकांची विभागणी झाल्यावर, मग समर्थक व विरोधक अश्या दोन गटांमधले लोक एक दुसऱ्याबद्दल विनाकारण वैर ठेवतात, मतभेद बाळगतात, अबोला पाळतात. काही वेळा तर, आपल्या गटातला माणूस एखाद्या माणसाशी त्याच्या वयक्तिक वादामुळे वैर ठेवत असेल, अबोला पाळत असेल तर आपणही त्या माणसाशी कारण नसतांना वैर बाळगतो केवळ आपल्या गटातला माणूस त्या व्यक्तीबद्दल त्याच्या वयक्तिक वादामुळे अबोला पाळतो आहे म्हणून व ह्या सर्व कारणांमुळे आज माणूस फक्त नावाने समाजात आहे मनाने नाही हि वस्तुस्थिती आहे. समाजातील गरिबाला, मानसिक मनोबल खचलेल्या लोकांना पाठबळ देण्याऐवजी समाज पाठ फिरवतो. फक्त स्वार्थ व आपल्यापणात बुडालेला हा समुदाय असतो. 

शेवटी एकच सांगतो...
आयुष्य खूप सुंदर व छोटं आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा एक नवी संधी, नवे स्वप्न, नवी दिशा, नवा आनंद घेऊन येत असतो व येणारा क्षण, दिवस हा भूतकाळात विलीन झाल्यावर पुन्हा कधीच परत येत नसतो. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा आनंदात विलीन करा. प्रत्येक क्षणात, प्रत्येक दिवसात भरभरून आनंद लुटा. घरट्याच्या बाहेर पडून आकाशात उंच भरारी घ्या. नवीन व सुशिक्षित विचार मनी ठेवा व नव्या विचारांवर वाटचाल करा. नव्या क्षितिजाकडे नेणारा दृष्टीकोन बाळगा. समाजातल्या निरर्थक मतभेदात, अबोला पाळण्यात सुंदर आयुष्य व आयुष्यातला सुवर्ण वेळ व्यर्थ घालू नका. गरीब व श्रीमंत हा फरक सोडा व मनाने श्रीमंत बना आणि मनाने श्रीमंत असलेल्याला जवळ करा. फक्त समाज समाज करून पार समाजात विरघळून जावू नका तर समाजाबाहेरील नाती सुद्धा भरभरून प्रेम देतात व जीवापाड जपतात हे लक्षात असू द्या. मग ते नाते मैत्रीचे असो वा मानलेले असो ते कधीही आपल्याला समाजापेक्षा जास्त समजून घेतात. 

..ණ मनोज गुजर          

Saturday, 12 July 2014

प्रेम म्हणजे काय..??


प्रेम ह्या शब्दाचं कोडं अजूनही बऱ्याच जनांना उमगलेलं नाहीये. पण प्रेम हा  विषय तरुणांमध्ये खूप गाजत आहे यात शंका नाही. आज तरुणांमध्ये प्रेम हे वेगवेगळ्या कारणांमुळे होतं असतं व मुलं/मुली काही करणांमुळेच एखाद्या मुलावर/मुलीवर प्रेम करतात. काही मुलं/मुली मुलाच्या/मुलीच्या सुंदर दिसण्यावर प्रेम करतात, काही मुलं/मुली लोभापाई प्रेम करतात, काही स्वार्थासाठी प्रेम करतात, काही आपल्याला कोणी प्रियकर असावा/प्रियसी असावी ह्या उद्देशाने प्रेम करतात, काही वासना मनी ठेऊन प्रेम करतात तर काही कारणाशिवाय म्हणजे कोणतेही कारण नसतांना निस्वार्थी प्रेम करतात. पण आज कारणाशिवाय प्रेम करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे.

पण जे "कारणाशिवाय" प्रेम करतात तेच खरे प्रेम आणि हाच प्रेम ह्या शब्दाचा खरा अर्थ आहे.

..ණ मनोज गुजर 

जीवनात व संस्कारात बदल घडणे आवश्यक आहे.


काही लोक नित्यनियम देव पूजा करतात व मंदिरात जातात, काही लोक आठवडयातून तीन ते चार वेळा देव पूजा करतात व मंदिरात जातात तर, काही लोक देवाचे नामस्मरण दिवसभरातून एखाद्वेळा तरी करतात. पण हे सर्व करत असतांना सुद्धा आमच्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी, मानसीक अस्वस्थता, दुखं कमी न होता दिवसंदिवस वाढतच आहे. तर याचं कारण काय असावं...?. मंदिरात गेल्यावर जितका वेळ आम्ही मंदिरात असतो तेवढाच वेळ आम्हाला प्रसन्न वाटतं व मंदिरातून बाहेर आल्यावर जैसे थे होतं. तसेच देवपूजा किंवा देवाचे स्मरण जितका वेळ आम्ही करत असतो तेवढाच वेळ आम्हाला प्रसन्न वाटतं आणि देवाचे नामस्मरण थांबवले, देवपूजा थांबवली कि, पुन्हा दैनंदिन अवस्था जैसे थे होते. तर याचं कारण काय असावं...?.

तर याचं कारण असं आहे कि, आम्ही नित्यनियम देवपूजा करतो, मंदिरात जातो व देवाचे नामस्मरण करतो पण आमच्या जीवनात व संस्कारात ते विचार उतरवत नाही. म्हणून आमची दैनंदिन परिस्थिती सुधारण्यापेक्षा दिवसंदिवस ढासळत आहे. आम्ही मंदिरात असतो किंवा देव पूजा करत असतो तितकाच वेळ स्वतःच्या अवगुणांना दूर ठेवत असतो आणि मंदिरातून बाहेर पडलो किंवा देव पूजा संपवली कि, पुन्हा एक-दुसऱ्याची निंदा करणे, एक-दुसऱ्याबद्दल अपशब्द व वाईट बोलणे, एक-दुसऱ्यावर जळणे ह्या सर्व निरर्थक गोष्टी आमच्या पूर्वरत चालूच असतात. म्हणून आमची दैनंदिन परिस्थिती सुधारण्यापेक्षा दिवसंदिवस ढासळत आहे.

प्रसन्न वाटतं म्हणून मंदिरात जाणे, देवपूजा व देवाचे नामस्मरण करणे याला काही एक अर्थ नाही. तर आपल्या जीवनात व संस्कारात बदल घडणे आवश्यक आहे. आमच्या जीवनात व संस्कारात ज्यादिवशी बदल होईल त्यादिवसापासून आमची दैनंदिन परिस्थिती सुधारेल, आमच्या जीवनातील दुखं व अडचणी दुरावतील. नाहीतर २४ तास जरी देव पूजा केली व मंदिरात बसून राहिलो तरी काही एक अर्थ नाही. 

..ණ मनोज गुजर 

आयुष्य खूप छोटं आहे.


सदैव रडण्यासाठी, नेहमी तणावात जगण्यासाठी, आपल्या परिस्थितीवर हाताश होऊन बसण्यासाठी आम्ही जन्माला आलो नाहीये. तर येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा आनंदात जगण्यासाठी, सदैव आनंदी राहण्यासाठी व प्रत्येकाला आनंद देण्यासाठी आम्ही जन्मलो आहोत. आयुष्य खूप छोटं आहे. आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा गेल्यावर पुन्हा येणार नाही तर, तो भूतकाळात विलीन होणार आहे. 

मग का म्हणून दुखी राहायचं..?. का म्हणून तणावात जगायचं..?. का म्हणून परिस्थितीवर हाताश व्हायचं..?. असल्या व्यर्थ गोष्टींवर वेळ फुकट न घालता आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस मनसोक्त जगा व आनंदी जगा. आयुष्य खूप छोटं आहे.
  
..ණ मनोज गुजर