Friday, 17 April 2015

सर्व काही तूच.

तूच देव जाणला
तूच देव मानला
तूच ठरवितो कोण
आस्तिक
तूच ठरवितो कोण
नास्तिक
तूच देव वर्णिला
तूच पाहिले त्याचे
विराट रूप
तरी, तूच म्हणवितो देव
निर्मितो आम्हास
तूच देव विभागला,
तूच देव जातीत वाटला,
तूच बांधली देऊळ,
तूच बांधली मंदिरं
तूच वेदाआधी होता
तूच परमेश्वराआधी होता
तूच जाणले वेदाचे
चमत्कार
तूच साजरे केले
ईश्वराचे जन्मोत्सव  
तूच सूर्याला सूर्य म्हटले
व सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटले
व चंद्र, चंद्र झाला   
तूच अवघ्या विश्वाचे
नामकरण केलेस
तूच आहेस सर्व काही
हे सामर्थ्यवान माणसा
तुझ्यामुळेच अर्थ आहे
विश्वाला हि
जाण असू दे रे माणसा.
 
.. मनोज गुजर

Friday, 3 April 2015

बदल.

धावतं युग, धावत्या युगात झपाट्याने व दररोज होणारे बदल, प्रत्येक गोष्टीत अत्याधुनिकता हे सर्व काही आज आम्ही स्वीकारतो आहे व हे बदल स्वीकार करणाऱ्यालाच ह्या युगात वावरता येईल हेही तितकेच सत्य आहे. इथे सर्व काही बदलत आहे पण मनुष्य मात्र तसाच आहे हि वस्तुस्थिती आहे. ह्या युगात प्रत्येक गोष्टीत बदल करणे खूप सोपं आहे. पण जगातील सर्वात मोठा व सर्वात कठीण बदल म्हणजे “माणसात होणारा बदल”. आज प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसात बदल घडवण्यात व्यस्त आहे व दुसरा मनुष्य आपल्यात. पण ह्या लपंडावात ना आपल्या काही हाती लागते, ना दुसऱ्या मनुष्याच्या हाती काही येते. यातून फक्त एकच निष्कर्ष हाती येतो तो म्हणजे “मौल्यवान वेळ व शक्ती खर्च होणे” (वेस्ट ऑफ टाईम अँड वेस्ट ऑफ एनर्जी). 

ते म्हणतात ना “सुंदर पोशाख करून विद्वान दिसणं खूप सोपं आहे पण सुदर पोशाख करून विद्वान बनणं खूप कठीण आहे” आमची सुद्धा अशीच गत झाली आहे. आम्ही जेव्हा समूहामध्ये असतो तेव्हा खूप विद्वान असल्याचे भासवतो व जेव्हा घरात असतो तेव्हा आपला मुळं स्वभाव दाखवतो.

तर आजपासून पहिले स्वतःत बदल घडवू, पहिले स्वतः बदलू व नंतर दुसऱ्यांना बदलवू. आपणच आपल्या जीवनात आपले आदर्श व प्रेरणास्थान होऊ. 

(टीप – हा बदल मी पहिले माझ्यात करायला सुरुवात केली आहे.)  

.. मनोज गुजर

Tuesday, 24 February 2015

विचार ५०.

आयुष्यात "बोलणारी" व्यक्ती बनू नका तर "करणारी" व्यक्ती बना. 

.. मनोज गुजर


Sunday, 7 September 2014

विचार ४९.

सर्व माणसांना दोन हात, दोन पाय व एक डोकं असे सारखेच अवयव असतात. पण माणसाला जातीचा अलंकार चढला कि, तो माणुसकी व माणसाला विसरतो आणि स्वतःला वेगळं समजू लागतो हि वस्तुस्थिती आहे.

.. मनोज गुजर

विचार ४८.

निर्मात्याने पृथ्वीतलावर प्रत्येक गोष्ट हि, वेगळी बनविली आहे. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. इतकेच नाही तर पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब सुद्धा सारखा नाहीये. प्रत्येक गोष्टीला आपापले वेगळेपण लाभले आहे आणि प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी सुंदर व एकमेव आहे. मग मानवाने स्वतःची तुलना एक-दुसऱ्याशी करून, का बरे स्वतःला कमी समजावे..?.

.. मनोज गुजर

विचार ४७.


दारूड्यांना कोण सांगेल व त्यांना कधी उमगेल कि, आपण दारू पितो व दारू आपल्याला खाते.
 
.. मनोज गुजर

विचार ४६.

पैसा कमवून कुजवण्यापेक्षा लोकांच्या हृदयात जागा रुजवा. पैसा कितीही कमवला तरी शेवटी त्याला इथेच सोडून जाणार आहोत पण लोकांच्या हृदयात रुजवलेली जागा चिरंतर राहील.

.. मनोज गुजर